Monday, October 22, 2007

जाहिरात

छाती पिटून तू ही कर जाहिरात आता
व्यापार वेदनांचा आहे भरात आता

खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते
असली जुनाट नाणी ना वापरात आता

वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली
कोणीच येत नाही या मंदिरात आता

ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी
भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता

प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा
मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता?

ज्यांनी मला दिलेले मृत्यूस सोहळ्याने
खांद्यावरून त्यांच्या माझी वरात आता...

साधी धूळ नाही

माझिया भाग्यात साधी धूळ नाही
हाय, या मातीत माझे मूळ नाही

या पुढे जाईन कोठे काय पत्ता
आगगाडीला जिवाच्या रूळ नाही

नाच तू पुंगी जशी वाजेल तैसा
नागराजा हे तुझे वारूळ नाही

नेहमी चौकोन त्यांचे गोल होते
मी गुण्याने आखुनी वर्तूळ नाही!

का कळेना मी इथे धावून आलो
(तारकांना धावण्याचे खूळ नाही!)

अंगणी येतात का काटेच माझ्या
मोगरा मी लावला, बाभूळ नाही

पेरला होता शिवारी प्राण आम्ही
आमच्या पानात का तांदूळ नाही?

प्रसाद शिरगांवकर
(साधं-सोपं.कॉमवरून साभार)

Wednesday, October 3, 2007

शब्द माझे

शब्द माझे एवढे करतील आता
माझियावाचूनही तरतील आता

आजच्यापुरता पुरेसा ध्वस्त झालो
भावनांचे पूर ओसरतील आता

ऊर बडवू लागले सदरे सुखाचे
वेदना मौनात वावरतील आता

माणसांशी जवळचे नाते निघाले
श्वापदे कोणांस घाबरतील आता?

व्यापले आभाळ आता तारकांनी
झोपड्या दारिद्र्य पांघरतील आता

मारण्याआधीच केले माफही मी
काय तुमचे हात थरथरतील आता?

जाहले शिंपून माझे रक्त सारे
ताटवे बहुतेक मोहरतील आता

आणखी नाहीत जगल्याचे पुरावे
फक्त हे डोळेच पाझरतील आता


--- वैभव जोशी

(सुरेशभट.इनवरून साभार)

हातघाई



एकट्याची हातघाई चालली
ही स्वतःसंगे लढाई चालली


रे भिकार्‍यांनो,लुटा ही देवळे
देवतांची गाइगाई चालली


बांधतो आहे बुटाचे बंद मी
फाटक्या चपलेत आई चालली


घेऊनी थैली रिकामी परतलो
शेर ना माझी रुबाई चालली


बंद कर तू नाकडोळे आपले
बंगल्यामध्ये मिठाई चालली


वाचणारा एकही नाही मला
चालली, वायाच शाई चालली!


-गणेश एस्.एम्. धामोडकर



(सुरेशभट.इन वरून साभार)

वार कुणावर.....

वार कुणावर माझ्याच्याने करवत नाही
घाव मनावरचे मी माझ्या मिरवत नाही...


कुणासारखे बनणे नाही जमले मजला
उगीच कित्ते कुणाचेच मी गिरवत नाही...


व्यवहाराने जीवन जगतो, हिशेब करतो
हट्ट मनाचे आताशा मी पुरवत नाही...


वचन मागणे बरेंचदा मी टाळत असतो
शब्द दिलेला कधीच मी पण फिरवत नाही...


बेत सारखा का बदलत जातो असा तुझा?
तुला भेटण्याचे मी आता ठरवत नाही...


गप्प राहतो म्हणून माझी असली थट्टा?
तुझी खोड तर अजूनही मी जिरवत नाही...


हात सोडणारेच भेटले 'अजब', म्हणूनच-
हात कुणाचा मलाच हाती धरवत नाही...


----- अजब

(सुरेशभट.इनवरून साभार)

 
Visit blogadda.com to discover Indian blogs