Monday, October 22, 2007

जाहिरात

छाती पिटून तू ही कर जाहिरात आता
व्यापार वेदनांचा आहे भरात आता

खोलीत अडगळीच्या चारित्र्य धूळ खाते
असली जुनाट नाणी ना वापरात आता

वादात भाविकांच्या मूर्ती दुभंगलेली
कोणीच येत नाही या मंदिरात आता

ही कुंपणे निकामी, कुलुपे - कड्या निकामी
भलत्याच पाहुण्यांची गर्दी घरात आता

प्रत्येक प्रांत देतो त्याचा स्वतंत्र नारा
मग राष्ट्रगीत यावे कैसे सुरात आता?

ज्यांनी मला दिलेले मृत्यूस सोहळ्याने
खांद्यावरून त्यांच्या माझी वरात आता...

No comments:

 
Visit blogadda.com to discover Indian blogs